अशोक चव्हाणांविरोधात मराठा आंदोलक आक्रमक ,म्हणाले विधानसभेला तुम्हाला साथ देणार नाही
Maratha protestors aggressive against Ashok Chavan, said they will not support you in the assembly
मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापले आहे. नांदेडमध्ये भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांकडून घेराव घालण्यात आला.
आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो. आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेत तुमच्या सोबत राहू नाहीतर तुम्हाला साथ देणार नाही, असा इशाराच मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना दिलाय.
खासदार अशोक चव्हाण यांना गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण
आणि पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना मराठा समाजाने घेराव घातला होता. आमच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा आणि मगच गावात पाय ठेवा, असा इशारा मराठा समाजातील आंदोलकांनी अशोक चव्हाण यांच्या कुटुंबियांना दिला होता.
त्यानंतर आता अशोक चव्हाण यांना एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला. अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील मुगट या गावी एका कार्यक्रमात बोलत असताना
मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले. आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो. आमच्या योद्धाची प्रकृती खालावत आहे. आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेत आम्ही तुमच्या सोबत राहू.
आरक्षण वेळेत दिले नाही तर तुमची साथ देणार नाही, असे खडेबोल आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना सुनावले. तूम्ही आरक्षणासाठी काय केल?
असा सवाल देखील आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना विचारला. काल रात्री मुगट या गावात कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. त्यानंतर भोकर विधानसभेसाठी त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या तयारी करत आहेत.
त्यानिमित्ताने त्यांनी अनेक गावांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चव्हाण कुटुंबीयांना भोकर मतदारसंघात मराठा आंदोलकांकडून सातत्याने विरोध होत आहे.
दरम्यान, लातूर येथे अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केले होते. मी मनोज जरांगे यांना मानतो. मराठा समाजासाठी त्यांनी काम केलं आहे.
न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार कटीबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने प्रयास सुरू आहेत, असे त्यांनी म्हटले होते.