सुनेने सुपारी देऊन केली सासूची हत्या
Daughter-in-law killed mother-in-law by giving betel nut
सुनेने चुलत भावांना दोन लाख रुपयांमध्ये सुपारी देऊन सासूचा खून केला. ही थरारक घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैत्रनगर येथे घडली.
पोलिसांनी दहा दिवसांनी थंड डोक्याने केलेल्या या या मर्डर मिस्ट्रीचे रहस्य उलगडले. अजनी पोलिसांनी सून व तिच्या दोन चुलत भावांना अटक केली.
सुनीता ओंकार राऊत (वय ५४,रा.मित्रनगर),असे मृतकाचे तर, वैशाली अखिलेश राऊत (३३), रितेश प्रकाश हिवसे (२७) आणि श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे (२१),
अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. भगवान भाऊराव मेंढे वय ५७ रा.शिवाजीनगर,हुडकेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली.
भगवान हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. भगवान यांची बहीण बहीण सुनीता, त्यांच्या सून वैशाली अखिलेश राऊत वय २० व मुलगी रिद्धिका उर्फ मिष्ठी वय ५ यांच्यासह मित्रनगर येथे राहायचे.
सुनीता यांचे पती ओंकार यांचे २०१६मध्ये निधन झाले. २०२३मध्ये अखिलेश याचाही मृत्यू झाला. २८ ऑगस्टला सुनीता यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शेजाऱ्याने भगवान यांना दिली. भगवान हे सुनीता यांच्या घरी गेले. सुनीता या पलंगावर निपचित पडल्या होत्या.
सुनीता यांना काय झाले,अशी विचारणा भगवान यांनी वैशालीला केली. आईला बीपीचा त्रास आहे. ह्दयविकाराच्या धक्क्याने
त्यांचा मृत्यू झाल्याचे वैशालीने भगवान यांना सांगितले. याचदिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास सुनीता यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
२७ ऑगस्टला वैशालीने वडिलांना चिकन गुनिया झाल्याचे सांगून उपचारासाठी शेजारी राहणाऱ्या अरुणा चौहान यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले.
ही रक्कम तिने ऑनलाइन भाडेकरुच्या खात्यात जमा करायला लावली. भाडेकरू शीता येलेकर यांनी ही रक्कम श्रीकांत हिवसे याच्या खात्यात जमा केली.
सुनीता यांच्या अत्यंसंस्काराच्या वेळी वैशालीचे वडील हजर होते. ही बाब कळताच भगवान यांना संशय आला. त्यांनी चौकशीला सुरुवात केली. वैशालीच्या मोबाइलची तपासणी केली असता ती सतत श्रीकांतच्या संपर्कात असल्याचे समोर आले.