हिंगोलीचा तरुण इंजिनिअर इराणच्या तुरुंगात भोगतोय शिक्षा
A young engineer from Hingoli is serving his sentence in an Iranian prison.
महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील एक इंजिनिअर तरुण दोन महिन्यांपूर्वी इराणला गेला होता. पण इराणला गेल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात त्याचा संपर्क तुटला. तो बेपत्ता झाला
. त्यानंतर त्याचा कुटुंबीयांशी काहीच संपर्क होऊ शकला नाही. आता अखेर दोन महिन्यानंतर संबंधित तरुणाशी संपर्क झाला आहे. एका गुन्ह्यात तो इराणच्या तेहरान तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित तरुणाने तुरुंगातून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे आपल्या पत्नीशी संपर्क साधला. त्यानंतर तो तेहरानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं समोर आलं आहे.
योगेश पांचाळ असं इराणमध्ये अटक झालेल्या हिंगोलीच्या तरुणाचं नाव आहे. तो पेशानं इंजिनिअर असून त्याचा इम्पोर्ट- एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे.
तो ड्राय फ्रुट्स, सफरचंद आणि एअर कूलर सारख्या वस्तू आयात निर्यात करतो. मागील वर्षी 5 डिसेंबरला तो एका कामानिमित्त टुरिस्ट विझावर इराणला गेला होता. इराणला गेल्यानंतर दोनच दिवसात म्हणजेच 7 डिसेंबरपासून तो बेपत्ता झाला. कुटुंबीयांशी त्याचा कसलाही संपर्क होऊ शकला नाही.
आता अखेर गुरुवारी 30 जानेवारीला त्याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे. पुढच्या मंगळवारी तुरुंगातून सुटका होईल, त्यानंतर मी भारतात परतेन, असं त्याने आपल्या पत्नीला सांगितलं आहे.
दोघांमध्ये जवळपास दीड मिनिटं संभाषण झालं आहे. या फोन कॉलमुळे पांचाळ कुटुंबीयांच्या जीवात जीव आला आहे. मागच्या दोन महिन्यांपासून योगेशचा कुटुंबीयांशी कसलाच संपर्क नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते.
खरंतर, इराणमध्ये गेल्यानंतर योगेशने काही संवेदनशील फोटोज क्लीक केले होते. त्याने मनोरंजन म्हणून हे फोटो क्लीक केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर योगेशविरोधात इराणमध्ये गुन्हा दाखल झाला
आणि त्याची रवानगी तेहरान तुरुंगात झाली होती. पण त्याने संबंधित फोटो पत्नीव्यतिरिक्त इतर कोणालाही पाठवले नव्हते. याबाबतचे योगेशचे व्हॉट्सअॅप डिटेल्स कोर्टासमोर सादर केल्यानंतर योगेशच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
इराणमधील भारतीय दुतावासाच्या मदतीने योगेशची सुटका होणार आहे. मंगळवारी त्यांची तेहरानच्या तुरुंगातून सुटका होऊ शकते. यानंतर त्याला भारतात पाठवलं जाऊ शकतं.