स्वागत समारंभात चोरट्याने डाव साधला, ३५ तोळे सोन्यावर डल्ला
During the reception, a thief made a move, stole 35 tolas of gold
नातेवाईकाच्या स्वागत समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या बेळगाव मधील एका महिलेचे सुमारे ३५ तोळे सोने अवघ्या दोन सेकंदात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
ही घटना सोमवारी शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी घडली आहे. दरम्यान याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चोरट्यांनी पाळत ठेवून हे कृत्य केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मावसभावाचा स्वागत समारंभ सोमवारी कोल्हापुरातील शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
या समारंभासाठी केतन नंदेशवन, आई मीना व अन्य कुटुंबीय आले होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्वागत समारंभात या कुटुंबाला फोटो काढण्यासाठी बोलावल्यानंतर केतन यांच्या आई मीना यांनी त्यांच्या पायाजवळ पर्स ठेवली
आणि फोटो क्लिक व्हायच्या आतच अवघ्या २ सेकंदात ही पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. फोटो काढून येताच हा प्रकार नंदेशवन यांच्या ध्यानात आला.
यानंतर सर्वांनी शोधाशोध केली पण उपयोग झाला नाही. या पर्समध्ये सुमारे चाळीस तोळे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल होता.
दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आणि नातेवाईकांनी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सीसीटीव्ही मध्ये सदर चोरटा हा सूटबुटामध्ये येऊन चोरी करून गेल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान, चोरीला गेलेल्या दागिन्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत २४ लाख रुपये इतकी होते. परंतु पोलिस रेकॉर्डवर १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
या चोरीची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.
पर्समध्ये असे होते दागिने
७.५ तोळ्यांचा हार
५ तोळ्यांचा कोयरी हार
३ तोळ्यांचे मंगळसूत्र
६ तोळ्यांच्या बांगड्या
५ तोळ्यांचे तोडे (२ नग)
५ तोळ्यांचे बाजुबंद
६.८ ग्रॅमच्या अंगठ्या (३ नग)
१.५ तोळा वजनाच्या सोन्याच्या रिंगा, कर्णफुले