बीड प्रकरणात प्राजक्ता माळीच्या नावाबाबत काय म्हणाले आ. सुरेश धस

What did MLA Suresh Dhas say about Prajakta Mali's name in the Beed case?

 

 

 

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सामान्य जनतेमध्ये मोठा रोष असल्याचं दिसून येत आहे. बीडमध्ये आज मूक मोर्चा काढण्यात येत असून सामान्य जनतेपासून सर्वपक्षीय नेतेमंडळी

 

या मोर्चात सहभागी होत असल्याचं सांगितलं जात आहे. या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असून त्याला मंत्री धनंजय मुंडे संरक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

 

यावरून मोठी चर्चा सुरू झाली असतानाच आता या सगळ्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे.

 

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना लक्ष्य करतानाच प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली आहेत.

 

अवैधरीत्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. या प्रकरणात नाव येत असल्याचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे आता यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे.

 

“विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते”, असं विधान त्यांनी केलं होतं.

 

तसेच, “जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे”, असंही ते म्हणाले होते.

 

दरम्यान, प्राजक्ता माळीचं नाव सुरेश धस यांनी या प्रकरणाबाबत भाष्य करताना घेतल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

 

“मी रश्मिका मंदाना, प्राजक्ताताई, सपना चौधरी यांची फक्त नावं घेतली. का घेतली, आता मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडला. सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली

 

आणि तुम्ही कृषीमंत्री असून तिकडे रश्मिका मंदानांचा कार्यक्रम घेता? तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे? त्यावर टीका झाली. राजू शेट्टीही इथे येऊन गेले. त्यांनीही टीका केली. धनंजय मुंडेंना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही”, असं सुरेश धस म्हणाले.

 

दरम्यान, सुरेश धसांविरोधात प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार दाखल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सुरेश धस यांनी भूमिका मांडली आहे.

 

“कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एकही शब्द मी बोललेलो नाही. त्यांनी माझी प्रतिक्रिया पुन्हा एकदा बघावी. जर त्यात त्यांना काही अवमानकारक वाटलं, तर त्यांनी महिला आयोगाकडे जावं.

 

बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्यानंतरही प्राजक्ताताईंनी ठरवलं तर माझी काही अडचण नाही. मी त्यांचा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम आवडीने पाहात असतो.

 

मनात असं असतं की एक चांगली मराठी मुलगी प्रगती करतेय, बरं वाटतं. त्यांनी जर तक्रार केली, तर मी त्याला सामोरा जाईन. मला काहीच अडचण नाही. मी तर त्यांचा उल्लेख ‘प्राजक्ता ताई’ असा केला आहे.

 

प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या बद्दल माहिती दिली आहे.

 

“अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अद्याप महिला आयोगाकडे तक्रार केलेली नाही. प्राजक्ता माळी यांनी अद्याप आमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. प्राजक्ता माळी यांनी, जर आमच्याकडे तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाणार”

 

असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. “बीडच्या घटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सखोल चौकशी करणार. विरोधकांचे काम आहे, आरोप करणं त्यासंदर्भात मी काय बोलणार?” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

 

“राजगुरुनगरमधील घटनेतील पीडित कुटुंबीयांना जी मदत अपेक्षित आहे, ती मदत केली जाणार. राजगुरुनगर घटनेतील आरोपीला फाशी देण्यासंदर्भात आयोगाकडून प्रयत्न केले जाणार” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

या सगळ्या वादावर अभिनेत्री प्राजक्ता माळी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. ‘माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार’ असल्याचे प्राजक्ता माळी यांनी सांगितलय.

 

मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. प्राजक्ता माळी थेट पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतील. उलट-सुलट सुरु असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळेल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *