महिला सरपंचाच्या पतीला १६ हजारांची लाच घेताना अटक
Husband of female sarpanch arrested while taking bribe of Rs 16,000
![](https://kharadarpan.com/wp-content/uploads/2023/11/anti-curreption.jpg)
पुण्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईची एकच चर्चा सुरु झाली आहे. तर घडले असे की, मौजे वरघड ग्रामंपचायतीच्या महिला सरपंचाच्या पतीला १६ हजारांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.
त्यासोबत लाच घेण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या गिवशी आंबेगावच्या सरपंचाला देखील अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटच्या समोरच्या बाजूस असलेल्या अतुल्य हॉटेलच्या पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या १६ हजारांची लाच घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
वरघड ग्रामंपचायतीच्या महिला सरपंचाचे पती नथुराम कोंडिबा डोईफोडे (३२, वर्षे, रा. रायकरमळा, धायरी गाव) आणि वेल्हातील गिवशी आंबेगाव गावचे सरपंच बाळासाहेब धावू मरगळे (३३,किरकटवाडी, हवेली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदाराने नुकतीच वेल्ह्यातील वरघड गावात जमीन खरेदी केली होती. जमिनीच्या पूर्वीच्या मालकाचे नावे असलेल्या घराच्या गाव नमुना ८ उताऱ्यावरील पूर्वीच्या मालकाचे नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराने या ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्या अनुषंगाने वरघड गावची सरपंच महिला सुवर्णा नथुराम डोईफोडे व त्यांचे पती आरोपी नथुराम हे त्यांना भेटले.
तक्रारदारांच्या कामासाठी व तसा ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यासाठी महिला सरपंच व तिच्या पतीने त्यांच्याकडे १८ हजारांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली,
त्यानंतर सापळा रचला गेला. त्यात सरपंचांचे पती नथुराम हे जाळ्यात अडकले तसेच त्यांना प्रोत्साहन देणारे गिवशी गावचे सरपंच बाळासाहेब मरगळे हे देखील गुन्ह्यात सामील असल्याचे आढळून आले. या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.