उद्या धनंजय मुंडे राजीनामा देणार? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Will Dhananjay Munde resign tomorrow? Viral post sparks debate

बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने १८०० पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे.
मंत्री धनंजय मुंडेंचा निकवर्तीय वाल्मिक कराड या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे असाही उल्लेख यात करण्यात आला आहे.
त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. आता धनंजय मुंडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील अशा चर्चा रंगल्या आहेत. याचं कारणही तसंच आहे. करुणा धनंजय मुंडेंची पोस्ट तशीच सूचक आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले आहे.
आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी. उज्वल निकम यांची आपण नियुक्ती केली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. असं सीआयडीने आरोपपत्रात म्हटलं आहे. तसंच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे निकटवर्तीय आहेत.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे. आधीही अशी मागणी झाली होती. मात्र राजीनामा झाला नाही. आता करुणा धनंजय मुंडे यांनी पोस्ट करत सोमवारी राजीनामा होणार असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे करुणा धनंजय मुंडेंची पोस्ट?
३-३-२०२५ ला राजीनामा होणार. #karunadhananjaymunde अशी एका ओळीची पोस्ट करुणा धनंजय मुंडेंनी पोस्ट केली आहे.
त्यांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागील वर्षी म्हणजेच ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली. यात वाल्मीक कराड मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
बीड येथे आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पाच्या कामात खोडा टाकण्याचे काम सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांनी केले. ६ डिसेंबर रोजी ते खंडणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुदर्शनने सुरक्षारक्षकाला मारहाण केली.
त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. पण वाद अधिक वाढला. खंडणी मागण्यासाठी गेलेल्या आरोपींना मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यानंतर या घटनेचा राग मानत ठेवून संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.
ही घटना ९ डिसेंबरची आहे. या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.