महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा नेता कारखाना वाचवण्यासाठी भाजपात ?
A big Congress leader from Maharashtra joins BJP to save the factory?

राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत.
त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता.
संग्राम थोपटे यांनी आता काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे.
संग्राम थोपटे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. त्यानंतर रविवारी ते काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं.
पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती.
आता या कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.भोरचे थोपटे कुटुंबीय आणि बारामतीचे पवार कुटुंबीय यांचा जुना राजकीय वाद आहे.
संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे मातब्बर नेते होते. ते सहा वेळा आमदारही होते. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना शरद पवारांनी ताकद लावून त्यांचा पराभव केला असल्याची चर्चा आहे. त्यानंतर अनंतराव थोपटे हे राजकारणात मागे पडले.
लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांचे आव्हान निर्माण केल्यानंतर पवारांनी नवी राजकीय समीकरणं जुळवून आणली.
त्यामध्ये भोरच्या थोपटे कुटुंबीयांशी 40 वर्षांपासून असलेल्या राजकीय वैराला त्यांनी मूठमाती देत अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. परिणामी सुप्रिया सुळे यांना भोरमधून मोठं मताधिक्य मिळालं आणि त्यांचा विजय सुकर झाला होता.