बोरी येथे कोयत्याने वार करत पतीने केली पत्नीची हत्या
Husband killed his wife by stabbing her in Bori
वारंवार सांगूनही सोबत राहायला तयार नसल्याने रागाच्या भरात पतीने शाळेत शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन पत्नीवर रस्त्यावरच कोयत्याने गळ्यावर चेहऱ्यावर वार करत
हत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी या गावात गुरुवारी (दि.१८) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे वालूर रोडवरील संभाजीनगर येथे राहणारी जयश्री वाव्हळ या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड याच्यासोबत झाला होता.
रोहित गायकवाड हा संभाजीनगर शहरात खाजगी कंपनीत कामाला होता. तेथेच पती-पत्नी राहत होते. परंतु गेल्या काही महिन्यापासून
या दोघांमध्ये वादविवाद वाढले. पत्नी जयश्री वाव्हळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई-वडिलांकडे बोरी (ता. जिंतूर) येथे राहायला आली होती.
मयत जयश्री नेहमी सारखीच शाळेत शिक्षणासाठी जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवले.
संभाजीनगर येथे राहण्याच्या कारणावरून तसेच इतर विषयांवरून त्या दोघांमध्ये नेहमीसारखाच वाद झाला. या रागात रोहितने पत्नी जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर धारदार कोयत्याने वार केले.
यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर ॲम्बुलन्स चालक व एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु परभणी शहराकडे उपचारासाठी रुग्णालयात घेवून जात असताना
रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे कळले. घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे,
पोलीस जमादार काळे, तूपसुंदर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे, परभणीच्या मोबाईल फोरेन्सिकचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
मयत जयश्री बोरी येथे शाळेत वर्ग नववीमध्ये शिक्षण घेत होती. भर रस्त्यावर तिची कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आली. यामुळे शालेय विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये भीती पसरली आहे.
सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा अतिरेक होत आहे. याशिवाय पालकांचे विद्यार्थ्यांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष नसल्याने अनुचित प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.