मुख्यमंत्री शिंदेनी सांगितले ;मराठा समाजाला कोणकोणत्या सवलती मिळणार?
Chief Minister Shinde said: What concessions will the Maratha community get?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज मोठं यश मिळालं. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे.
यामुळे मराठा समाजाचा ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मराठा समाजाला आता कोणकोणत्या सवलती मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे नवी मुंबईत आले होते. त्यांनी आपल्या हाताने ज्यूस देऊन जरांगे यांचं उपोषण सोडवलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी एपीएमसी मार्केट परिसरात जमलेल्या लाखो मराठा बांधवांसोबत संवाद साधला.
“मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे. ती शपथ पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहेत”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत. आज मराठा समाजाला
कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला आपण मुदतवाढ दिली आहे. तसेच गरीब मराठ्यांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी ठिकठिकाणी शिबीरे लावली आहे.”
“सगेसोयरे याबाबत आज सरकारने अध्यादेश काढला असून वंशवळीसाठी समिती देखील नेमण्यात आली आहे. मागासवर्ग आयोग्याच्या माध्यमातून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं
तसंच सुप्रीम कोर्टात टिकणारं स्वतंत्र आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाईल”, असं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.
“सध्या ओबीसी समाजाला आरक्षणातून ज्या-ज्या सवलती मिळतात. त्या-त्या मराठा समाजाला देखील मिळेल, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी भरसभेतून सांगितलं आहे.
मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील”, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.