हिंगोली लोकसभा ; चौथ्या दिवशी पाच उमेदवारांकडून आठ अर्ज दाखल
Hingoli Lok Sabha; On the fourth day, eight applications were filed by five candidates

हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी आज उमेदवारांकडून आठ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या चौथ्या दिवशी 15 उमेदवारांना 60 अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 86 इच्छुक उमेदवारांना 303 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.
तर चौथ्या दिवशी आज मंगळवार, दि. 02 एप्रिल रोजी 5 उमेदवारांनी 8 नामनिर्देशन अर्ज दाखल केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत
दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या 10 झाली आहे. आज दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
श्री. नामदेव ग्यानोजी कल्याणकर (अपक्ष) यांनी दोन अर्ज, श्री. रवि यशवंतराव शिंदे (ओबीसी बहुजन पार्टी) यांनी एक अर्ज, श्री. देशा शाम बंजारा (अपक्ष) यांनी एक अर्ज, श्री. वसंत किसनराव पाईकराव (अपक्ष)
यांनी दोन अर्ज व श्री. नागेश बाबुराव पाटील आष्टीकर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह याकामी नियुक्त अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील.
शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.