शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का
Sharad Pawar's big blow to BJP
विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.
भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. भाजपला सोडचिठ्ठी देण्याआधी सुधाकर भालेराव यांनी आज
भाजपच्या प्रदेश कार्यालयाला भेट दिली. यापुढे ही मित्रांना भेटण्यासाठी येत जात राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भालेराव मागासवर्गीय समाजातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत, सुधाकर भालेराव हे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतील.
संजय बनसोडे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत असून उदगीरमधून आमदार आहेत. संजय बनसोडे यांच्याकडे सध्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय आहे.
दरम्यान सुधाकर भालेराव यांच्याआधी मागच्याच आठवड्यात भाजपला छत्रपती संभाजी नगरमध्येही धक्का बसला होता. भाजप नेते राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
राजू शिंदे मागच्या काही काळापासून भाजपमध्ये नाराज होते. भाजपच्या नेत्यांकडून राजू शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला,
पण यामध्ये भाजप नेत्यांना यश आलं नाही. अखेर राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.