शरद पवारांनीच आंदोलन करायला सांगितले;अजित पवारांचा खळबळजनक दावा
Sharad Pawar himself asked to protest; Ajit Pawar's sensational claim

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन रायगडमधील कर्जत येथे पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. अजित पवारांनी शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला
त्यावेळी काय घडलं? हे सांगितलं. शरद पवारांकडून आम्हाला गाफील ठेवलं जात होतं, असं अजित पवार म्हणाले. राजीनामा मागं घेण्यासाठी शरद पवारांच्या आदेशानेचं आंदोलनं सुरु होती, असं देखील अजित पवार म्हणाले.
आम्हाला सातत्यानं गाफील ठेवलं गेलं. मी मागं जात नाही पण यामध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमुखापासून सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत.
प्रफुल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आम्ही दहा बारा जण होतो.
देवगिरीला बसलो होतो. आम्ही काय करायचं असा विचार करत होतो. थेट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल याचा विचार करुन सुप्रिया सुळेंना घरी बोलावलं होतं.
त्यांना सांगितलं की लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो. तरच संघटना पुढे जाते. त्यांनी सात दिवसांचा वेळ मागितला, शरद पवारांना कन्व्हिन्स करते, असं त्या म्हणाल्या, असं अजित पवारांनी सांगितलं.
आम्ही सात ते दहा दिवस थांबलो. जयंत पाटील आणि अनिल देशमुख होते. सरकारमध्ये जायला हवं, अल्पसंख्यांक समाजाचा विचार झाला पाहिजे. स्थगित्या उठल्या पाहिजेत या भूमिकेतून शरद पवार यांच्याकडे गेलो.
पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाऊन भेटलो. वेळ जातोय एकदा काय ते निर्णय घ्या, असं सांगितलं. १ मेचा दिवस होता, मला बोलावून सांगितलं की सरकारमध्ये जावा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,
असं सांगितलं. २ तारखेला कार्यक्रम होता, कुणाला काही माहिती नव्हतं, घरातील चार जणांना राजीनाम्याबाबत माहिती होतं. पंधरा जणांची समिती झाली. शरद पवार त्यानंतर घरी गेले, असं अजित पवार म्हणाले.
शरद पवारांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतलं, युवक आणि महिला आघाडीच्या लोकांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाहेर आंदोलन करायला सांगितलं होतं
तिथं काही जण आंदोलन करत होते, तिथं एकही आमदार नव्हता, जितेंद्र आव्हाड सोडले तर असं अजित पवार म्हणाले.
राजीनामा मागं घेतला गेला, त्यानंतर सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा, असं सांगितलं गेलं. जी धरसोड सुरु होती ती मला मान्य नव्हती. आम्ही २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर तो निर्णय आवडला नव्हता तर १७ जुलैला का बोलावलं,
असं अजित पवार म्हणाले. पहिल्यांदा मंत्री आणि आमदारांना बोलावलं त्यानंतर त्यांच्यासोबतच्या आमदारांशी चर्चा करुन सगळं सुरळीत होणार असं सांगितलं गेलं. गाडी ट्रॅकवर आहे असं सांगायचे, असं अजित पवार म्हणाले.