मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजा केल्याचा वाद; पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान
Controversy over Modi performing Ganpati Puja at Chief Justice's house; Prime Minister spoke for the first time
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गणेशोत्सव काळात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती करत दर्शन घेतलं.
त्यामुळे देशात एकच गदारोळ उडाला. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या या आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
मी गणपती पूजा केली तर काँग्रेसने लांगूलचालन सुरू केलं. त्यांना माझं हे कृत्य अजिबात आवडलेलं नाही. त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
विश्वकर्मा योजनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने आज वर्ध्यात एका जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मोदींनी गणपती पूजेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे चांगलेच वाभाडे काढले. काँग्रेसला गणपती पूजेची प्रचंड चीड आहे. मी गणेश पूजेला गेलो होतो. तेव्हा काँग्रेसने लगेच तुष्टीकरण सुरू केलं.
काँग्रेसने माझ्या गणपती पूजेलाही विरोध केला आहे. लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस काहीही करत आहे, असा हल्लाच नरेंद्र मोदी यांनी चढवला.
लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू झाला. सर्व धर्मीय एक साथ येत होते. पण काँग्रेसला गणपती पूजेची चीडच आहे. त्यांनी कर्नाटकात बाप्पाला तुरुंगात टाकलं.
पोलीस व्हॅनमध्ये डांबलं. इकडे महाराष्ट्र गणपतीची पूजा करत होता, तर तिकडे कर्नाटकात गणपती बाप्पा पोलिसांच्या व्हॅनमध्ये होते, असा हल्लाच मोदींनी केला.
काँग्रेसपासून सावध राहा. काँग्रेसने केवळ भ्रष्टाचार वाढवला आहे. देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट पार्टीचं कुटुंब म्हणजे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे.
त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी देऊ नका. नाही तर ते पुन्हा तुम्हाला बरबादीकडे घेऊन जातील, असं मोदी म्हणाले.
बारा बलुतेदारांनी आपली कौशल्याची परंपरा जपली. त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने या परंपरेकडे लक्ष दिलं नाही.
या बारा बलुतेदारांना वाऱ्यावर सोडलं. आमचं सरकार येताच आम्ही आपली ही गौरवशाली परंपरा पुन्हा स्थापित करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही पुन्हा या कौशल्य विकासाच्या परंपरेला संजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्या. आपण
तिसरी आर्थिक महाशक्ती होणार आहोत. त्यात या बारा बलुतेदारांचं योगदान फार मोठं असणार आहे, असं मोदींनी स्पष्ट केलं.
विश्वकर्माच्या लाभार्थ्यांनी मोठ्या उद्योग समूहाशी निगडीत व्हावं हे आमचं लक्ष आहे. जो वर्ग आर्थिक प्रगतीत मागे होता. तो जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
सरकारची स्कील मिशन त्यांना सशक्त करत आहे. कौशल्य विकास अभियानाने भारताच्या स्कीलला जगात ओळख निर्माण करून दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं.