एकाच कुटुंबातील ५ जणांची गळफास घेऊन आत्महत्या
5 members of the same family committed suicide by hanging

राजस्थानच्या बिकानेरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांना गळफास लावून आयुष्य संपवलं. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या ५ मुलांचा समावेश आहे.
घटना मुक्ताप्रसाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंत्योदय नगरात घडली. कुटुंबातील ४ सदस्यांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडले. तर कुटुंब प्रमुखाचा मृतदेह फरशीवर पडलेल्या स्थितीत आढळला.
आर्थिक विवंचनेतून कुटुंबानं आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पण कुटुंबाच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मृतांची ओळख पटली आहे. हनुमान सोनी (४५), त्यांची पत्नी विमला (४०), मुलगा मोहित (१८), ऋषी (१६) आणि मुलगी गुडिया (१४) अशी मृतांची नावं आहेत. चौघांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्या सापडले.
कुटुंबातील पाच जणांपैकी कोणीही गेल्या २ दिवसांपासून शेजाऱ्यांना दिसलं नाही. त्यांच्या घराच्या दारावर दुधाच्या पिशव्या तशाच होत्या. घरातून दुर्गंध येत होता. यानंतर शेजाऱ्यांनी घरमालक अनिल रंगा यांना फोन केला.
त्यांनी येऊन दार ठोठावलं. पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी अघटित घडल्याची शंका आल्यानं त्यांनी पोलिसांना बोलावलं.
पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर पाच जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली. ही बातमी आसपास पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.
हनुमान सोनी यांचं कुटुंब गेल्या ८ महिन्यांपासून घरात भाड्यानं राहत होते, अशी माहिती घरमालक अनिल रंगा यांनी दिली. हनुमान सोनाराच्या दुकानात काम करायचे.
पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले. ४ जणांच्या हत्या करुन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
कुटुंब प्रमुखाचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. तर पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसांना शंका आहे.