युनियन बँकेत कोट्यवधींचा अपहार ;ठेवीदारांना घाम फुटला
Crores embezzled in Union Bank; depositors sweat

मुदत ठेवींच्या रकमेत विमा प्रतिनिधीने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर युनियन बँक खातेदारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून,
अनेक ठेवीदारांनी आपल्या रकमा काढण्यासाठी तसेच ठेवी पावत्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी गुरुवारी बँकेकडे धाव घेतली होती.
मात्र, बुद्धपौर्णिमेची सुटी असल्याने खातेदारांचा हिरमोड झाला. बुधवारी १४ ठेवीदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यामुळे हा अपहार आठ ते दहा कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनमाड येथील युनियन बँक शाखेतील विमा प्रतिनिधी संदीप देशमुख याने केलेल्या अपहाराची रक्कम आठ ते दहा कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
बुधवारी १४ ठेवीदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर गुरुवारी (दि. २३) आणखी १२ तक्रारदारांनी पोलिस ठाणे गाठले. बुद्धपौर्णिमेची सुटी असल्याने गुरुवारी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद होते;
त्यामुळे ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला. याप्रकरणी बँक प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून, बँकेकडील रेकॉर्डवर असलेल्या ठेवींची बँक हमी घेणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
येथील युनियन बँकेच्या शाखेत बसणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे समोर येताच मनमाडमध्ये तातडीने दाखल झालेल्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
त्यानंतर मनमाड शाखेतील कर्मचाऱ्यांची बदली करून त्या जागी नवे कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती बँकेच्या सुत्रांनी दिली.
बँकेकडील रेकॉर्डवर असलेल्या ठेवींची बँक हमी घेणार असल्याचे व तसे हमीपत्र देणार असल्याचे बँक प्रशासनातर्फे खातेदारांना सांगण्यात आले.
फसवणूक झालेल्या बहुतांश बँक खातेदारांचा तक्रारीचा एकच सूर आहे. गेल्या काही वर्षांपासून बँकेशी संलग्न असलेल्या एम. एस. सूद या विमा कंपनीचा प्रतिनिधी संदीप सुभाष देशमुख (रा. चाळीसगाव) हा बँकेतच बसत असे.
त्याने बँक खातेदारांचा विश्वास संपादन करून अनेकांना बँकेत मुदत ठेवी काढण्याचा सल्ला दिला. बँक खातेदारांना आपण बँकेचाच अधिकारी असल्याचे भासवून अनेकांकडून मुदत ठेवींच्या रकमा स्वतः घेऊन त्या बँकेत जमा केल्या नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
अनेक ग्राहकांकडून मुदत ठेवींची रक्कम काढण्यासाठी बेअरर चेक घेऊन देशमुख याने परस्पर रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचे अनेक खातेदारांचे म्हणने आहे.
मुदत ठेवींचा अपहार करण्यासाठी संशयिताने बँकेच्या नावाचे खोटे लेटरपॅड, खोटे शिक्के, अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
नोकरदार, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, गृहिणी, परिसरातील छोटे व्यावसायिक व परिसरातील काही शेतकऱ्यांचा फसवणूकदारांमध्ये समावेश असून, त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या आहेत.