उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणार काय ?या प्रश्नावर काय म्हणाले फडणवीस ?
Will there be an alliance with Uddhav Thackeray again? What did Fadnavis say on this question?

उद्धव ठाकरेंपासून आम्ही मनाने दूर गेलो आहोत. ते आमचे मित्र आहेत का, हा प्रश्न आता त्यांनाच विचारावा लागेल. दिवसरात्र आमच्या नेत्यांना शिव्या घालणाऱ्या व्यक्तींसोबत आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकू का वाटत नाही, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आधीपासून आमचे चांगले संबंध होते. माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं होतं. मोठ्या प्रकल्पांवर आम्ही एकत्र काम केलंय.
एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयातही त्यांनी विरोध केला होता.
शिवसेना-भाजप सरकार पुन्हा स्थापन होण्यासाठी ते प्रयत्न करत होते. परंतु उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मविआ सरकार स्थापन होताना पहिल्या दिवसापासूनच शिंदेंच्या मनात अस्वस्थता होती.
सरकार स्थापन करणं ठीक, परंतु आपल्या विचारधारेच्या विरोधातील गोष्टी मान्य करणं, शिवसेनेतील एका गटाला पटत नव्हतं. उद्धव ठाकरेंच्या वर्तनाने त्यांच्यापैकी काही जण इतके वैतागले,
की त्यांना वाटलं आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, मग काय, आम्ही संधी सोडणारे नव्हतोच, आणि जनादेशही आमच्या बाजूनेच होता. त्यामुळे आम्ही युती केली आणि सरकार स्थापन केलं, असं देवेंद्र फडणवीस सांगत होते.
एकनाथ शिंदेंप्रमाणे उद्धव ठाकरेही तुमचे मित्र होते, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की उद्धव ठाकरेही माझे मित्र होते… यावर ‘मित्र होते की आहेत?’ असा प्रतिप्रश्न त्यांना करण्यात आला.
त्यावर फडणवीस म्हणाले, की ते आमचे मित्र आहेत का, हा प्रश्न आता त्यांनाच विचारावा लागेल. कारण मित्र तो असतो, जो एखादी गोष्ट जमत नाही, तर स्पष्ट सांगतो.
त्यांनी फोन करुन बोलायला हवं होतं की, नाही जमत आहेत गोष्टी. पाच वर्ष मी मुख्यमंत्री होते. ते आमचे साथीदार होते. दिवसा रात्री आम्ही कधीही फोन करायचो, आम्ही खूप वेळ बोलायचो, मी कधी त्यांचं बोलणं टाळलं नाही.
मविआच्या वेळी मी फोन करत राहिलो, पण त्यांनी उत्तरच दिलं नाही. त्यांनी म्हणायला हवं होतं, की नाही देवेंद्र जी तुमच्यासोबत नाही जायचं. त्यामुळे मित्र आहेत का, हा प्रश्न त्यांनाच विचारा. रस्ता त्यांनी बंद केला, दरवाजा त्यांनी बंद केला, असं फडणवीस म्हणाले.
ठाकरेंशी बोलणं होतं का, असा प्रश्न विचारला असता. आमच्यात आता औपचारिक बोलणं होत नाही. आम्ही एकमेकांची विचारपूस करतो, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती तितकी तर टिकून आहे.
“वारं जोरदार वाहतंय, या वाऱ्याने बंद झालेला दरवाजा उघडेल का?” असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर “राजकीय मतभेद असते तर ठीक होतं, पण त्यांचे काही नेते आमचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करतात,
त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. आता आम्ही मनाने दूर झालो आहोत. एखाद वेळेस त्यांनी स्तुती केलीही असेल. पण दिवसातून दहा वेळा मोदींना शिव्या दिल्या नाहीत तर त्यांना जेवण पचत नाही.
एक जण तर त्यांनी शिव्या द्यायलाच ठेवलाय. सकाळी नऊ वाजता त्यांचा भोंगा सुरु होतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.
ज्यांना २५ वर्ष आम्ही भावासारखी वागणूक दिली. ज्यांच्यासोबत सुख दुःख वाटून घेतलं, अशी लोक पाठीत खंजीर खुपसतात, तुमच्या नेत्यांविषयी खोटं बोलतात, तेव्हा मन तुटतं, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंशी आमची भावनिक युती आहे.अजित पवारांसोबत युती ही धोरणात्मक असल्याचं मी मान्य करतो, पण कदाचित पाच वर्षांनी तीही भावनिक युती होऊ शकेल, असं फडणवीस म्हणाले.