शेतकऱ्यांना पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर मिळणार बियाणे
Farmers will get seeds for sowing on 50 percent subsidy
राज्यभरात जोरदार पाऊस झाला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्याचबरोबर खरिप हंगामातील पेरण्यांना सुरवात झाली. कृषी केंद्रांवर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत आहे.
अशातच आता नाशिक जिल्हा परिषदच्या ‘जिल्हा परिषद सेस फंड’ या योजनेंतर्गत बियाण्यांवर 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेत दिलेल्या माहीतीनुसार उडीद, भुईमुग, तूर हे बियाणे शेतकरी 50 टक्के अनुदानावर खरेदी करू शकणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना
आपआपल्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेबाबतचे अर्ज पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच अर्ज प्रकिया देखील सुरू करण्यात आली आहे.
सर्वप्रथम शेतक-यांचा मागणी अर्ज विहीत नमुन्यात घेण्यात यावा. त्यानंतर अर्जासोबत स्वत:च्या कुटुंबाचे नावे असलेले 7/12 व 8-अ चे अद्ययावत उतारे सादर करणे गरजेचे आहेत.
योजनेतील अटी आणि शर्ती नुसार एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त 1 हेक्टरसाठी आवश्यक बियाण्याचा लाभ देण्यात यावा. असे सांगण्यात आले आहे.
अनुसुचीत जाती जमाती, अपंग व महिला शेतकर्यांसाठी शासनाने निर्धारीत केल्याप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे. प्राधान्य क्रम ठरवताना अनु जाती/अनु. जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक
व वनपट्टेधारक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात लाभ दिलेल्या शेतक-यांना दुसऱ्यांदा लाभ दिला जाणार नाही. असं सांगण्यात आले आहे.
दरम्यान, योजना ही सन 2024-25 या वित्तीय वर्षात खरीप रब्बी उन्हाळी हंगाम मध्ये राबवण्यात येणार. योजनेसाठी आवश्यक बियाणे
हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ सातपूर, नाशिक या शासन अंगीकृत संस्थेकडून मंजूर दराप्रमाणे बियाणे खरेदी करुन पुरविण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ नाशिक यांच्याकडून हे बियाणे पुरवण्यात येत आहेत. तूर बियाण्याची दोन किलोची बॅग असून तिची किंमत 420 रुपये आहे,
तर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर देण्यात येत असल्याने ती केवळ 210 रुपयाला मिळणार आहे.मूग बियाण्यांची 02 किलोची बॅग 450 रूपयांना असून शेतकऱ्यांना किंवा 225 रुपये भरावे लागणार आहेत.
उडीद बियाण्यांची दोन किलोची बॅग असून ती 380 रूपयांना असून यासाठी शेतकऱ्यांना केवळ 190 रुपये भरावे लागणार आहे.
तर भुईमुगाची 20 किलोची बॅग असून 3200 रूपयांना आहे. शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 1600 रूपयांना मिळणार आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.