आता आरक्षण वादात प्रकाश आंबेडकरांची उडी ;आरक्षण बचाव यात्रा काढणार
Now Prakash Ambedkar's jump in the reservation debate; he will take out the reservation rescue yatra
राज्यात आरक्षणाचा वाद पेटला असताना मराठा आणि ओसीबी नेते आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी
शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा देत समाजाला आवाहन केलं आहे. त्यामुळे, आरक्षणाचा वाद नेमका कसा सुटणार,
या वादावर मार्ग कसा निघणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच, आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे.
छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याचं म्हटलं.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय घोषणा करतील, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का? राजकारणात या घोषणामुळे मोठी उलथापालट होणार का ?
असे तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र, आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
एसी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षण हक्कासाठी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत, अशी घोषणाच त्यांनी आज केली. ओबीसींचा लढा ओबीसी संघटनांनी लढावा, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
अनेक ओबीसी संघटनांची विनंती, ओबीसी लढ्याला हाती घ्या, सध्या परिस्थिती भयानक आहे. काहीजण नामांतराची आठवण करून देत आहेत,
पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी वर्सेस मराठा हा श्रीमंत मराठ्यांनी लावलेला वाद असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले. जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनास सुरुवात केलेली आहे,
आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हते.
या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. त्यामध्ये सामंजस्याने तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष काँग्रेस,
राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोपर्यंत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत तोडगा निघणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख यांना व्यक्तिगत पत्र लिहावे,
मुख्यमंत्री म्हणून पण लिहावं व्यक्तिगत देखील लिहावं. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत आश्वासन दिले की आम्ही पत्र लिहू, अजूनपर्यंत
वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेले नाही, इतर पक्षाला मिळाले का याबाबत आमच्याकडे काहीही खुलासा नाही, असेही आंबडेकर यांनी यावेळी म्हटले.
वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय, मराठवाड्यातून आता ही मागणी पश्चिम महाराष्ट्र खान्देश या ठिकाणी देखील पसरू लागलेली आहे. त्यानुसार,
वाशिम आणि बुलढाण्यातील काही भागात परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ओबीसी संघटनांची मागणी होती की आपण वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतोय ती गावो गावी गेली पाहिजे.
त्यामुळे, या सामाजिक संघटनांना घेऊन 25 तारखेला दादर चैत्यभूमी येथून आपण आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करायची, असं आम्ही ठरवल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं.
तसेच, 26 जुलै रोजी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रेचला सुरुवात होईल. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना
या जिल्ह्यात ही यात्रा निघणार आहे. तसेच, 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या यात्रेची सांगता होईल. या मार्गावरती कॉर्नर बैठका ठेवल्या आहेत, त्यातील मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील, असेही प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.
श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना फसवलं आहे, त्यामुळे ओबीसींच्या हातामध्ये सत्ता द्या अशी मागणी या यात्रेच्या माध्यमातून करणार.
गरीब मराठ्यांना टिकाऊ आरक्षणाचे वेगळे ताट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही आंबेडकर यांनी म्हटलं.
यात्रेतील प्रमुख मागण्या
1-ओबीसींच्या आरक्षण वाचलं पाहिजे
2-एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे,
3-ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची स्कॉलरशिप तशीच्या तशी लागू झाली पाहिजे
4-घाई गर्दीमध्ये कास्ट फॉर्म इशू करण्यात आला आहे, तो रद्द करण्यात यावा.
5-जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच,
6-आरक्षणात एससी एसटी आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे.