आता राज्यात होणार समूह विद्यापीठ;मार्गदर्शक सूचना जारी
Group university to be set up in the state now; guidelines issued

मुंबई : राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित, तसेच नव्याने स्वायत्त झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या शेकडो जागा रिक्त ठेवून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील महाविद्यालयांना समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
विभागाकडून राज्यातील स्वायत्त आणि खासगी महाविद्यालयांतील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि इतर असंख्य बाबींचा विचार न करता समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी घेतलेला निर्णय हा केवळ संस्थाचालकांच्या हिताचा ठरणार असल्यानेच त्यासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांवर पुढील काळात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) या अंतर्गतही विद्यमान उच्च-कार्यक्षम शैक्षणिक संस्थांचे समूह विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय मागील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ही विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या विद्यापीठांच्या स्थापनेसाठी निकष जारी करण्यात आले आहेत.
यात महाविद्यालयांची संख्या, संस्थात्मक आवश्यकता, शैक्षणिक मानके, विद्यापीठाची निर्मिती प्रक्रिया आणि विघटन यांचा समावेश आहे. विद्यापीठात सामील होणारी महाविद्यालये ही
स्वायत्तता नॅक आणि एनबीए गुण मिळवलेली आणि २० वर्षांपासून अस्तित्वात असलेली असणे आवश्यक आहे. यात पाच वर्षांपासून स्वायत्त दर्जा घेतलेल्यांना प्राधान्य असेल.
सहभागी महाविद्यालयांना नॅक अथवा ३० टक्के अभ्यासक्रमांना एनबीए मान्यता असणे आवश्यक असेल. एकाच संस्थेच्या एकाच जिल्ह्यातील किमान २ व कमाल ५ अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना समूह विद्यापीठ म्हणून समावेश होईल, त्यात एक अनुदानित असणे आवश्यक राहील.
यात पारंपरिक व व्यावसायिक महाविद्यालये यांचाही समावेश असेल. यात सामील होणारी महाविद्यालये ही मागील २० वर्षांपासून कार्यरत असली पाहिजेत. शिवाय त्यातील प्रमुख महाविद्यालयांत दोन, तर एकूण सर्व महाविद्यालयांमध्ये चार हजार विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली आहे.