सायबर चाेरट्यांनी महिलेस डिजिटल अटक करून साडेतीन लाख उकळले
Cyber thieves digitally arrested the woman and extorted three and a half lakhs
नाशिक/अमन शेख
अंमली पदार्थ वाहतूक प्रकरणात तुमचा सहभाग असल्याची भिती दाखवून चोरट्यांनी एका महिलेस सुमारे साडे तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
नोकरदार महिलेच्या फिर्यादीनुसार तिला संशयितांनी ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ करुन कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याचे धमकावत २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत हा गंडा घातला.
नाशिक शहर सायबर पोलीस तपास करत आहेत.संशयितांनी महिलेस व्हॉट्सअपवरून संपर्क साधून करिअर कंपनीतून तसेच मुंबई सायबर पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले.
तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये २०० ग्रॅम अंमली पदार्थ, ५ पासपोर्ट, ३ एटीएम कार्ड व इतर वस्तू आढळून आल्याचे महिलेस सांगितले. तसेच तुमची चौकशी केली जात असून
तुमच्या बँक खात्यातून मनी लॉड्रींगचे व्यवहारही केल्याची भिती घातली. त्यामुळे अटक वॉरंट काढल्याचे महिलेस सांगितले. व्हॉट्सअपवरच महिलेचा नोटीस पाठवून
तुमच्यावर पोलिसांचे लक्ष असून मनी लॉड्रींग करणाऱ्यापासून तुमच्या व कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याची भितीही दाखविली.
त्यानंतर महिलेस प्रत्येक तासाला मेसेज करण्यास भाग पाडून महिलेस व्हर्च्युअल अटक केल्याचे भासवले. कारवाईबाबत कोणालाही न सांगण्याचा इशारा भामट्यांनी दिल्याने महिलेने ही बाब कोणालाही सांगितली नाही.
तसेच भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने महिलेकडून ३ लाख ३६ हजार ७९३ रुपये खंडणी स्वरुपात घेत गंडा घातला. अखेर फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात महिलेशी संपर्क साधणाऱ्यांसह व्हॉट्सअपधारक, ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.