महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार?नेत्याचे मोठे विधान
Who will get how many ministerial posts in the grand alliance? Leader's big statement
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान आता मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार आणि
इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच शिवसेना अजूनही गृहमंत्रिपदाबाबत आग्रही आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत देखील त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. मीडियामधून चर्चा आहे की येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे,
असं मी ऐकतो आहे. 14 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत.
कोणाला कोणतं खातं मिळेल? हे येत्या दोन दिवसांत तुम्हाला कळेल तोपर्यंत तुम्ही सस्पेन्स ठेवा. रोज सकाळी मीडियावाले सांगतात,
आम्हाला गृह खातं पाहिजे, पण अशा कुठल्याही खात्यासाठी चर्चा अडलेली नाही.सन्मानपूर्वक मंत्रिपदाचे वाटप होईल, असं सामतं यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं म्हटलं होतं. यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ममतादीदींकडे नेतृत्व गेलं पाहिजे असं शरद पवार साहेब म्हणाले होते, हा खरा काँग्रेसचा अपमान आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका यशस्वी होत नाहीत, हा ठपका नेत्यांनी ठेवला आहे.
हा काँग्रेसचा झालेला अपमान आहे त्यामुळे आम्ही या संदर्भात काय बोलणार? राहुल गांधी यांचे नेतृत्व काढून ते आता जर ममता बॅनर्जी
यांच्याकडे येणार असेल तर राहुल गांधी यांचं नेतृत्व कमकुवत आहे, असं महाविकास आघाडी दाखवत आहे, अशी प्रतिक्रिया सामतं यांनी दिली आहे.
दरम्यान देवेंद्र फ़डणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात मंत्री पदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे.
चर्चाच नाही तर अनेक ठिकाणी मोठं-मोठाली बॅनर, पोस्टर्स लागली आहेत. पण खरा पेच हा गृह खात्याचा आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी गृह खात्याचा ट्विस्ट येणार असल्याचा दावा अनेकजण करत आहे.
राज्यमंत्री मंडळाची यादी दिलीत गेली की नाही याबद्दल कल्पना नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता विस्तार हा करावाच लागेल, असे वक्तव्य शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी केल आहे.
नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी या विस्तार होणार अशी माहिती आहे आणि दोन ते तीन दिवसांमध्ये विस्तार होईल असं समजत आहे, असा खुलासा त्यांनी केला आहे.
खाते वाटप हा महायुतीमधील कळीचा मुद्दा ठरणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे ते गृहखात्यासाठी अजूनही आग्रही असल्याची चर्चा आहे.
यावर सुद्धा संजय शिरसाट यांनी संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळाबाबत कुठलाही घोडा अडलेला नाही, बरीच मोठी प्रोसिजर, प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले.
कुणाला कुठलं खातं द्यायचं, याबद्दल चर्चा तर करावीच लागणार असे सांगत त्यांनी पत्ता उघड केला. महायुतीला मोठे यश मिळाल्याने मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या पण अधिक असल्याचे त्यांनी सांगीतले.
दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी जी बैठक होते ती ईव्हीएम बाबत होत नाहीये तर ती राहुल गांधी यांचे नेतृत्व बदलण्यासाठीची बैठक असल्याचा दावा शिरसाट यांनी केला.
राहुल गांधीवर अविश्वास दाखवण्यात येत आहे. राज्यात जे काही घडलं, लोकसभेत जो काही पराभव झाला यानंतर इंडिया आघाडीला एक नव्या नेतृत्वाची गरज आहे
आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व सोपवलं जाईल असं वाटतंय, असे ते म्हणाले. ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित करून विरोधकांना काही मिळणार नाहीये केवळ त्यांच्या वेळ जाणार आहे असा टोला त्यांनी हाणला.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवला आता संजय राऊत शरद पवार यांना पक्ष संपवण्यासाठी कदाचित शरद पवार यांची भेट घेतील आणि हिंदुत्व बद्दल बोलण्याचा संजय राऊत यांना कुठलाच नैतिक अधिकार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी हाणला.
जयंत पाटील हे महायुतीमध्ये येऊ शकतात हे भाषण आम्ही सहा महिन्यापूर्वीच केलं होतं , विधानसभा निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षातले बरेचसे आमदार राष्ट्रवादी सोडून
अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मर्ज होण्यासाठी इच्छुक असल्याचे सध्या दिसते आणि ते लवकरच होईल असं वाटत आहे, असे शिरसाट म्हणाले.