अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांचं प्रचंड नुकसान
Unseasonal rains and hailstorms cause huge damage to crops
महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसाला आहे. विशेष म्हणजे विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत. खूप मेहनतीने, मन लावून, कष्ट करुन पिकं वाढवली,
पण ऐनवेळी पिकं मोठी झाल्यावर आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे.
शेतकरी एकीकडे हमीभावासाठी वर्षानुवर्षे झगडत आहेत. त्यांचा परिस्थितीशी संघर्ष सुरु आहे. असं असताना अवकाळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या नशिबाची पुन्हा थट्टा केली आहे.
विदर्भातील नागपूर, वर्धा, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गिरपिटीने शिवारात उभ्या असलेल्या पिकांना अक्षरश: जमिनदोस्त केलं आहे.
नागपूरसह विदर्भाच्या काही भागात शनिवारी रात्री गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यातील काही गावात गारपीटसह पाऊस पडला.
या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. याशिाय विदर्भाच्या अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट तर गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
वर्धा जिल्ह्यातही गारिपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगणघाट परिसराला गारपिटीचा जबर तडाखा बसलाय. हिंगणघाट शहरासह काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.
जवळपास पंधरा मिनिटे ते अर्धा तास गारपीट झालीय. गारपिटीमुळे ग्रामीण भागात गहू, चणा, तूर आदी पिकांचे नुकसान झालंय. तसेच काही भागात देखील अवकाळी पाऊस पडला आहे.
वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीटीने झालेल्या नुकसानीची खासदार रामदास तडस यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे.
त्यांनी शेतात बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. देवळी तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसला आहे. गारपिटीत गहु, चना, तूर, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर आणि किनवट तालुक्यात आज सायंकाळी काही ठिकाणी आवकाळी पाऊस पडलाय. नांदेड आणि विदर्भाला लागून हे तीन तालुके आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज विदर्भात पाऊस झाला. नांदेड जिल्हयातही काही ठिकाणी तुरळक पाऊस झालाय. तर हिमायतनगर,
उमरी आणि भोकर तालुक्यात काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. दरम्यान सायंकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बोरी, चातारी, सावळेश्वर, माणकेश्वर, गंजगाव, कोपरा, देवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय.
या अवकाळी पावसाच्या संकटामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेले गहू, चना, तूर आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यात काल झालेल्या गारपिटीने चना, तूर आणि गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गोंदळी, मुबारपूर, एरंनगाव येरणगाव, विरखेड, वाढखेड गवंडी गावांतील पिकांना
गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. या तालुक्यातील जवळपास 3 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यावर्षी सुरुवातीला खरिपात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कपाशी आणि सोयाबीन याचे नुकसान झाले होते.
तर रब्बी हंगामातील चना आणि गहू काढणीला येत असताना गारपीट झाले. आजपर्यंत खरिपातील पिकविमाचे मदत मिळाली नसून
आता आलेल्या या संकटामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.