लोकसभा निवडणुकीसाठी फक्त ५५ दिवस शिल्लक;भाजपच्या हालचाली वाढल्या
Only 55 days left for the Lok Sabha elections; BJP's movements increased
तीन राज्यात भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपच्या नेत्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढलाय. या निकालानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप आमदाराची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लवकर होतील, असे संकेत देण्यात आलेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष देखील उपस्थित होते. आचारसंहितेला फक्त ५५ दिवस बाकी आहेत.
आमदारांनी कामाला लागावे असे, आदेश यावेळी देण्यात आलेत. भाजप आमदारांच्या बैठकीत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशात लवकरच लोकसभा निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिलेत.
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यासाठी आता फक्त ५५ दिवस उरलेत. तुम्ही सर्वांनी कामाला लागा, असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यावेळी म्हणाले.
भाजपने लोकसभेची तयारी सुरू केलीय. यापार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठांनी आमदारांना एक टास्क दिलाय. आमदारांना आपल्या मतदारसंघात कमीत कमी ३० हजार नमो अॅप्स डाउनलोड करून घेण्याचे टास्क देण्यात आलेत.
तसेच आमदारांनी दररोज साधरण पाच मिनीटं नमो अॅपवर घालावीत. जे आमदार अॅपवर वेळ घालवणार नाहीत त्यांचा रिपोर्ट हा राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिला जाईल अशी तंबी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी आमदरांना दिली.
महाराष्ट्रात आतापासूनच रण तापलं आहे. भाजपनं रणनीती आखली असून, तिच्या अंमलबजावणीलाही सुरुवात केल्याचं दिसतं. भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने मार्गदर्शन शिबीर आयोजित केले असून, फडणवीस हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. आतापासून सर्व राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.
मागील दीड ते दोन वर्षापासून संपूर्ण देशाचं राजकारण ज्या महाराष्ट्राभोवती फिरतंय, तिथेच थेट अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचे दिसते.
मुंबईतील भाईंदर उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये हे मार्गदर्शन शिबीर होणार आहे. पुढील दोन दिवस ते भरवलं जाणार असून, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे
हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं ‘महाविजय २०२४’ मोहीम हाती घेतलीय. त्यानुसार पक्षाने रणनीती आखली आहे. संपूर्ण राज्यात वॉररूमचं जाळं उभारलंय.
वॉररूममधून २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलीय. आता विधानसभा क्षेत्रांतील आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आणि बुथप्रमुखांची एक टीम तयार केली होती. योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली की नाही याचा आढावा बैठकीत घेणार आहेत.
प्रत्येक मतदारसंघ आणि उमेदवारांवर वॉररूमद्वारे भाजप लक्ष ठेवणार आहे. मतदारसंघांतील समस्या आणि महत्वाच्या विषयांची माहितीही घेतली जाईल.
२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना कोणत्याही परिस्थितीत सोबत घेण्याच्या संदर्भातही शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.