भाजपात जाण्याच्या चर्चावर काय म्हणाले अमित देशमुख ?
What did Amit Deshmukh say on the discussion of going to BJP?
आगामी निवडणुका लक्षात घेता फूट रोखण्यासाठी काँग्रेसने पक्षातील एकजूट कायम राहावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे पडसाद शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसच्या लोणावळा येथील शिबिरात दिसून आले.
निवडणुकीत सर्वांनी हिरीरीने भाग घेत एकजूट होऊन लढावे, असे आवाहन पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. ‘ज्यांना सर्व काही दिले ते घर सोडून जातात, ही खेदाची बाब आहे’,
अशी भावना व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी केंद्र सरकारची दडपशाही आणि शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नांविरोधात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे निषेधाचा ठराव या शिबिरात मंजूर करण्यात आला.
लातूरला जातोय, वेगळे तर्क लावू नका, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र, आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस शिबिरातून निघताना बजावलं.
देशमुख कुटुंबीय भाजपमध्ये प्रवेश करणार ही अफवा असून, या चर्चा प्रसारमाध्यमातूनच आम्हाला ऐकायला मिळतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांची सूत्रे काय आहेत ते माहीत नाही,
असे काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी सांगितले. ‘मी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी आहे. पुढे मी माझ्या लातूर येथील एका नियोजित कार्यक्रमाला जात असून, याबाबत वेगळे तर्क लावू नका’, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराला शुक्रवारी लोणावळा येथे सुरुवात झाली. या शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणाने झाले.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनाप्रसंगी खर्गे यांनी केलेल्या भाषणात केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच ‘मोदींची गॅरंटी‘ असे म्हणतात. त्यांच्या बोलण्यात मीपणा जास्त असतो.
आपण ‘आम्ही भारताचे लोक’ असे म्हणतो, परंतु मोदी मात्र मी, मी असेच करतात. मोदी सातत्याने खोटे बोलतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदी यांनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही.
२०१४ मध्ये मोदी यांनी काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख रुपये देऊ, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, या गॅरंटी दिल्या होत्या. या मोदी गॅरंटीचे काय झाले’, असा प्रश्न त्यांनी केला.
‘ज्यांना सर्व काही दिले ते घर सोडून जातात, ही खेदाची बाब आहे. पण आपण समोर बसलेले सर्वजण पक्षाशी आणि जमिनीशी जोडलेले नेते आहोत. आपली निष्ठा व प्रामाणिकपणा हाच पक्षाच्या विचारांचा कणा आहे,’ असे ते म्हणाले.