विधानसभेसाठी काँग्रेसने 10 ऑगस्टपर्यंत इच्छुकांचे अर्ज मागवले
Congress invited applications from aspirants till August 10 for the assembly
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला. महाविकास आघाडीतील काँग्रेसने 13 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळविली.
लोकसभेतील या यशापाठोपाठ आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रसने आतापासूनच कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरवात केली आहे.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती आणि पक्ष निधीसह 10 ऑगस्ट 2024 पर्यंत दादर येथील काँग्रेस मुख्यालय टिळक भवन कार्यालयात पाठविण्याचे आवाहन कॉंग्रेसकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी याची माहिती देताना सांगितले की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात तसेच सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज पक्ष निधीसह 10 ऑगस्टपर्यंत सादर करायचा आहे.
सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी 20 हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि महिला इच्छुक उमेदवारांना 10 हजार रुपये पक्षनिधी अर्जासोबत भरावे लागणार आहेत.
जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जे इच्छुक उमेदवार अर्ज सादर करतील त्या जिल्हा कार्यालयाने 10 ऑगस्टपर्यंत जमा झालेले सर्व अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत. यामधून उमेदवार निश्चित केले जातील असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदार याद्या अद्ययावत करण्यावर भर द्या अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 25 जून ते 24 जुलै 2024 या काळात मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का? ते पहावे असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
मतदार यादीमध्ये मतदारांची नावे नसल्यास ती पुन्हा यादीत समाविष्ठ करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. मतदारांचे नाव, पत्ता यात काही बदल करायचा असेल तर ती सर्व कामे करावीत.
जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया करून घ्यावी. तसेच, ज्यांनी वयाची 18 वर्षे पुर्ण केली आहेत त्यांचीही नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावर भर द्यावा, अशी सूचनाही नाना पटोले यांनी केली.