पोलिसांकडून व्यापाऱ्याला थेट सोन्याच्या बिस्किटाची मागणी, गुन्हा दाखल
The police demanded gold biscuits directly from the trader, a case was registered
सोने गहाण ठेवून घेतलेले कर्ज फेडत नसल्याने एका सोनेव्यापाऱ्याने कर्जदाराविरुद्ध आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
उपनिरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलने सोन्याचे बिस्कीट आणि रोख रकमेची मागणी केली. आधी पैसे घेऊनही पुन्हा लाच मागणाऱ्या पोलिसांची व्यापाऱ्याने तक्रार केल्यानंतर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे, उपनिरीक्षक राहुल जाधव आणि कॉन्स्टेबल गणेश मोजार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चेंबूर परिसरात या व्यापाऱ्याचे सोने खरेदी-विक्रीचे दुकान असून सावकारी कर्ज देण्याचा परवाना असल्याने हा व्यापारी व्याजाने पैसेही देतो. तीन ते चार जणांनी सोने गहाण ठेवून त्याबदल्यात कर्ज घेतले होते.
मात्र मुद्दल आणि व्याज दुप्पट-तिप्पट झाले तरी कर्ज फेडत नसल्याने व्यापाऱ्याने या कर्जदारांविरुद्ध आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार केली.
या लेखी तक्रारींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत करपे, जाधव आणि मोजार यांनी जवळपास दीड लाख रुपयांची मागणी केली.
व्यापाऱ्याने ही रक्कम दिली मात्र तरीही कारवाई केली जात नव्हती. वरिष्ठांनादेखील खूश ठेवावे लागत असल्याचे सांगत पोलिसांनी सोन्याचे बिस्कीट आणि ६० हजार रोख मागितले.
पुन्हा लाच द्यायची नसल्याने या व्यापाऱ्याने एसीबी कार्यलयात लेखी तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे एसीबीने म्हटले आहे.