,परभणी लोकसभा मतदारसंघात बंडू जाधव यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना देणार टक्कर
In Parbhani Lok Sabha Constituency, Bandu Jadhav will be challenged by Swabhima Farmers Association
नवीन वर्षाचं स्वागत करताना ते मागच्या वर्षी सारखं वाईट वर्ष जाणार नाही अशी आशा करतो. आता यापुढे कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही आणि झाला तर मुकाट्याने सहन करायचं नाही हा आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा यावर्षीचा संकल्प आहे
असे म्हणत यंदाचा हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे आणि या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहा जागांवरून लोकसभा निवडणूक लढवेल अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन सोबत बोलताना दिली आहे.
याशिवाय मतदार संघ देखील त्यांनी यावेळी सांगितले असून बुलढाण्यात रविकांत तुपकर हे संघटनेमार्फत निवडणूक लढले तर आम्हाला आनंदच आहे. आमची देखील हीच इच्छा आहे असेही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटले आहे.
आज पासून २०२४ या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून हे वर्ष राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं वर्ष मानलं जात आहे. या वर्षात लोकसभा निवडणुकांसह अनेक निवडणुका देखील लागणार असून यासाठी प्रत्येक पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
सर्व आघाड्यांशी फारकत घेत स्वबळावर राजू शेट्टी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचं चित्र सध्या निर्माण झाले आहे.मात्र हातकणंगलेमध्ये किती रंगी लढत होईल माहीत नाही.
पण जे उमेदवार असतील त्यामध्ये मी असणार हे नक्की आहे.आणि मला मतदारांवर विश्वास आहे आणि मी जिंकणार आहे यावर देखील माझा विश्वास आहे, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना ही राज्यात सहा जागांवरून निवडणूक लढवणार असून यामध्ये हातकणंगले ,कोल्हापूर ,सांगली, माढा ,परभणी आणि बुलढाणा हे लोकसभा मतदारसंघ असून स्वबळावर आम्ही निवडणूक लढवू, बुलढाणा
लोकसभा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत निवडणूक लढवत असतील तर त्याचा आम्हाला आनंद असून आमची ही तीच भूमिका आहे.
मत मतांतर असणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. एखाद्या संघटनेत वेगळ्या मताचे लोक असतील तर आश्चर्य वाटून घेण्याचे काय कारण आहे.
मात्र, रविकांत तुपकर यांनी संघटना सोडणार नाही असे आधी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते उमेदवार असतील तर आमची काहीही हरकत नसेल असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.
यामुळे बुलढाण्यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असतील यात काही शंका राहिलेली नाही.
:
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत, अशी इच्छा महाविकास आघाडी मधील वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आम्ही सर्व आघाड्यांपासून फारकत घेऊन काम करत आहोत.
आम्ही महाविकास आघाडी मधून का बाहेर पडलो याची चौकशी करायला महाविकास आघाडी मधील कोणताही नेता आला नाही. कदाचित त्यांची सत्ता होती म्हणून त्यांना आम्ही आवश्यक वाटलो नसेल.
शेतकऱ्यांसाठी सहा पानी पत्र लिहून शरद पवार यांना दिलं होतं, त्या पत्राचे उत्तर हे अद्यापही आलेले नाही. आधी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि मग आघाडीची भाषा करावी, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. ही लोकशाही आहे प्रत्येकाला येथे आपले मत मांडायचा अधिकार आहे.
मात्र मतं मागत असताना सभा घेत असताना संवेदनशील विषयाला हात घालून लोकांची डोक भडकतील अशा पद्धतीची वक्तव्य करू नये.
राजकीय फायद्यासाठी असे वक्तव्य करण्याऐवजी विश्वासात घेऊन लोकांना मत मागा असेही माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.