महाराष्ट्रात काँग्रेस फुटीच्या चर्चावरून बाळासाहेब थोरात संतापले

Balasaheb became furious over the talk of Congress split in Maharashtra

 

 

 

 

चारपैकी तीन राज्यांत सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘इंडिया’ आघाडी करून विरोधी पक्षांना साथीला घेऊन भाजपला तुल्यबळ लढत देऊ,

 

 

 

असं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसने लोकसभेची सेमी फायनल गमावल्याने पक्षात उलट सुलट चर्चांना सुरूवात झालीये. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पराभव झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील उमटतील

 

 

 

आणि त्याची परिणीती महाराष्ट्र काँग्रेसमधील नेते फुटण्यात होईल, अशी चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे. मात्र राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेस एकजूट आहे, असं ठामपणे विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

 

 

 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असून,

 

 

 

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढीस लागणार आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाली.

 

 

 

पण काँग्रेस पक्षात मात्र कोणतीही फूट पडली नाही. परंतु लोकसभेआधीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला पराभव आल्याने येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपकडे गेल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको,

 

 

 

अशी कबुली काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. याच संभाव्य काँग्रेस फुटीच्या बातम्यांचं बाळासाहेब थोरात यांनी खंडन केलंय.

 

 

 

ट्रीपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे.

 

 

 

महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधी पक्ष एकजुटीने लढतो आहे.

 

 

 

अशावेळी संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहे, असं सांगताना माध्यमेही त्याला प्रसिद्धी देत आहेत, अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

त्याचवेळी राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेस एकजूट आहे, असं निक्षून सांगताना जनविरोधी सरकारच्या विरोधात आम्ही संघर्ष करत राहू, असा निर्धार यानिमित्ताने बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *