“डॉ.बाबासाहेबांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर…”; वडेट्टीवार यांच्या परभणीतील वक्तव्यावरून वादंग

“If Dr. Babasaheb had converted to Islam…”; Controversy over Vadettiwar's statement in Parbhani

 

 

 

 

माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आतून आरक्षण देण्याला विरोध आहे, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

 

 

 

काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी रविवार, दि. १९ रोजी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानात भगवान गौतम बौद्ध यांच्या मूर्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

 

मला दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे. मी माझ्या समाजाच्या हक्कांसाठी लढत आहे. इतरांना दु:ख होईल, इतरांना वेदना होतील, अशाप्रकारची माझी भूमिका कधीही राहणार नाही. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील लढतोय, हा त्यांचा प्रश्न आहे.

 

 

ते त्यांच्या समाजासाठी लढतायत, आम्ही आमच्या समाजाचे हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी लढत आहोत. कोणी समाजात उभी फूट पाडू पाहत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. मग तो कोणताही नेता असो, ओबीसीचा असो किंवा मराठा नेता असो.

 

 

 

‘मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात विधान करताना संयम बाळगावा. ओबीसी समाजसुद्धा त्यांचा निश्चित सन्मान राखेल,’ असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

 

 

 

सध्या देशात धर्मा धर्मात आणि जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे. जगातले सर्वात मोठे धर्मांतर नागपूरात झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

 

 

 

त्यावेळी त्यांना अनेक धर्माकडून निमंत्रण होते, मात्र, त्यांनी शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जर कदाचित त्यांनी बौद्ध धर्माऐवजी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते. म्हणून शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची संपूर्ण विश्वाला गरज असल्याचे वड्डेटीवार म्हणाले.

 

 

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून उपमुख्यमंत्रीपद दिले. हे केवळ भारतातच घडू शकते, असा टोलाही वड्डेटीवार यांनी लगावला. ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरील धार्मिक कार्यक्रम आटोपून वडेट्टीवार यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.

 

 

 

 

यावेळी रेल्वे स्टेशनसमोर पाच ते सहा मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

 

 

 

 

‘राज्य विधिमंडळातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करावी,’ अशी मागणी वैजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील सदाफळ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली.

 

 

 

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी परभणीत रविवारी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून त्यावर टीका झाली. याबाबत विचारलं असता विजय वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असं आवाहन केलं.

 

 

 

विजय वडेट्टीवार म्हणाले, “त्या भाषणात मी जो मुद्दा मांडला तो त्यावेळीही अनेक वक्त्यांनी मुद्दा मांडला होता. अनेक साहित्यिकांनीही हा मुद्दा मांडला होता. मी तो मुद्दा त्यावेळच्या परिस्थितीत नाही, तर आजच्या परिस्थितीत मांडला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. कारण धर्माधर्मात विष पेरणारी माणसं आज देशात राज्यकर्ते झाले आहेत.”

 

 

 

 

“दिल्लीत काय चाललं आहे. तेथे हिंदू मुस्लीम यांना एकमेकांविरोधात लढवलं जात आहे. त्यामुळे आज डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाची काय परिस्थिती झाली असती. या आजच्या परिस्थितीनुसार मी ते वक्तव्य केलं आहे. त्याचा अर्थ आज डॉ. आंबेडकर असते आणि त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. त्याला आजचे राज्यकर्ते जबाबदार असते,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

 

 

 

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “देशात जाती-धर्मात विष पेरण्याचं काम सुरू आहे. तो कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नव्हता, तर बुद्ध मूर्ती वितरणाचा होता. आपण बुद्धांच्या मार्गावर चाललो, तर देश आणि जग शांततेच्या मार्गावर चालेल. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना ती स्पष्ट भूमिका मांडली होती.”

 

 

 

 

“त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना अनेकांनी मुस्लीम धर्म स्वीकारण्याची विनंती केली होती. आज ते असते आणि त्यांनी तो निर्णय घेतला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. कारण आजचे राज्यकर्ते दिल्लीत बसून दोन धर्मात विष पेरत आहेत. असं त्या बोलण्याचा अर्थ होता. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *